पारनेर : तालुक्यातील जामगाव येथे ग्रामदैवत मळगंगा देवीजवळ असलेले बंद घर चोरांनी फोडून हातसफाई केली. साडेतीन तोळे वजनाचे गंठण व ४९ हजार ५०० रूपयांची रोकड असा १ लाख ४५ हजार रूपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. पारनेर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी धाव घेवून चौकशी केली.जामगाव येथील रहिवासी असलेले शिरूर एस. टी. वाहतूक नियंत्रक व कामगार नेते दिलीप खोडाळ यांच्या घरात गुरुवारी चोरीची घटना घडली. खोडाळ हे शिरूर व जामगाव येथील दोन्ही घरात राहतात. हल्ली शिरुर येथे राहत असताना जामगाव येथील घर बंद होते. दोन दिवसानंतर जामगाव येथील घरी गेल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले. घरातील साहित्याची उचकापाचक होवून कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड चोरी झाल्याचे लक्षात आले. खोडाळ यांनी पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. चोरटे सीसीटीव्हीत कैदजामगावचे ग्रामदैवत मळगंगा मंदिराजवळच ही चोरीची घटना घडली. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. त्या रात्री तीन ते चार चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या असल्याची माहिती समजते. नवरात्र असल्यामुळे देवीला लाखो रूपयांची सोन्याची दागिने चढविण्यात आलेले आहेत. चोरांचा डोळा देवीच्या दागिण्यांवर तर नसेल ना अशी शंका ग्रामस्थांना पडली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
जामगावमध्ये घरफोडी; दीड लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 5:32 PM