हळगांव : एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे वाहनचालक त्रस्त झाले असतानाच जामखेड तालुक्यातील हळगांवमध्ये अज्ञात चोरट्यांनी चक्क तीन हजार लिटर डिझेल व दोनशे लीटर पेट्रोलवर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील हळगांव येथील जामखेड - चोंडी रस्त्यावर जामखेडच्या दिशेने तात्याराम काळे यांचा श्री दत्त पेट्रोल पंप आहे. चोरट्यांनी या पेट्रोल पंपाच्या मागील बाजुने पंपापासुन ३० ते ३५ फुट अंतरावरून पंपाच्या स्टॉक टाकीत पाईप टाकुन मोटारीच्या सहाय्याने स्टॉक टँकमधून चक्क तीन हजार लिटर डिझेल दोनशे लीटर पेट्रोलवर डल्ला मारला. ही घटना ८ आॅक्टोबर रोजी पहाटे घडली. या चोरीत चोरट्यांनी अडीच लाख रूपयांचे पेट्रोल डिझेल चोरून नेले आहे. एवढी मोठी चोरी होत असताना पेट्रोल पंपावरील एकाही कर्मचा-यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला नाही.दरम्यान ९ आॅक्टोबर रोजी पेट्रोल पंपाच्या स्टॉकची माहिती घेत असताना डिझेल व पेट्रोलची चोरी झाल्याची बाब समोर येताच एकच खळबळ उडाली. या चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पेट्रोल कंपनीचा रिपोर्ट आवश्यक होता. १० आॅक्टोबर रोजी कंपनीकडून तपासणी करण्यात आली. कंपनीने दिलेल्या पत्रानुसार दत्त पेट्रोलियमचे मालक तात्याराम काळे यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चव्हाण हे करत आहेत.पोलिसांसमोर आव्हानहळगांव पेट्रोल पंपासारखीच चोरी मागील चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात उघडकीस आली होती. पेट्रोल पंपावरील डिझेल व पेट्रोलची चोरी करणारे मोठे रॅकेट मराठवाड्याच्या सिमाभागात कार्यरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या रॅकेटचा पदार्फाश करण्याचे मोठे आव्हान अहमदनगर व बीड पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.