अहमदनगर : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे बुरुडगाव कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास मनाई असताना महापालिका कचरा आणत आहे. त्यामुळे बुरुडगाव येथील ग्रामस्थांकडून दोन दिवसांपासून कच-याची वाहने अडविण्यात आली आहेत. दरम्यान पोलीसबंदोबस्तात कचरा नेऊन वाहने अडविणा-यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.राष्ट्रीय हरित लवादाने दोन महिन्यांपूर्वी बुरुडगाव डेपोमध्ये अॅनिमल वेस्ट टाकण्यास मनाई केली आहे. मात्र सर्वच कचरा टाकण्यास मनाई केल्याचा दावा बुरुडगाव ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर बुरुडगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडे तक्रार करीत कचरा टाकण्यास मनाई केली आहे. महापालिकेची कचरा वाहून नेणारी वाहने दोन दिवसांपासून अडविण्यात आली आहेत.यामुळे वाहनांमधील कचरा वाहनातच असून शहरातील कचरा उचलला जात नसल्याने पुन्हा एकदा कच-याचे संकट येणार आहे. कचरा डेपोमुळे ग्रामस्थांना त्रास होत असून प्रदूषणही होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य संकटात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे ग्रामस्थ पालन करीत असून महापालिकेनेही पालन करावे, असे आवाहन भाऊसाहेब कुलट, राधाकिसन कुलट, उद्धव कुलट, आत्माराम कुलट यांनी केले आहे. याबाबत चौघांच्या सहीने जिल्हाधिकारी यांच्याकडेही निवेदन दिले आहे. दरम्यान कचरा वाहने अडविणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. एन. एस. पैठणकर यांनी दिला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशात बुरुडगाव डेपोत फक्त अॅनिमल वेस्ट टाकण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच खत प्रकल्पाच्या ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तेथील खतप्रकल्प सुरू असल्याने त्रास होण्याचे कारण नाही, असे डॉ. पैठणकर यांनी स्पष्ट केले.
घनकचरा व्यवस्थापन कोलमडले असून शहरातील कचरा संकलन करण्यात अडथळे येत आहेत. संपूर्ण कचरा विल्हेवाट करण्यासाठी वाहने आणि कर्मचारी अपुरे आहेत. सावेडी येथील कच-याचा प्रश्न मिटला असल्याने सावेडी उपनगरातील कच-याची विल्हेवाट सुरळीत होत आहे. मात्र बुरुडगाव कचरा डेपोत जाणारा कचरा अडविल्याने जुन्या शहरातील साचलेल्या कच-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात शहरात पुन्हा एकदा कच-याचे ढीग दिसणार आहेत.