राहुरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस दोन दिवस वांगीपर्यंत का जात नाही? यासंदर्भात चालक व वाहकाची श्रीरामपूर विभागीय कार्यालयात चौकशी करण्यात आली. दोघांकडून लेखी घेण्यात आले असून वांगीपर्यंत नियमित बस धावणार आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून आठवड्यातील शनिवारी व रविवारी होणारे बसचे खंडित धावणे नियमित होणार असल्याने प्रवाशी वर्गाने स्वागत केले आहे.एका मंत्र्याच्या पीएच्या पत्नीसाठी धावते बस असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच पाथरे परिसरात वाचक ांनी सामूहिक वाचन केले़. पाथरे बस वांगीपर्यंत का जात नाही? यासंदर्भात चालक सोनबा वायळ व वाहक बाळू बिडवे यांची श्रीरामपूर विभागीय कार्यालयातील डेप्युटी मॅनेजर बाळासाहेब शिंदे यांनी चौकशी केली. तुम्ही वांगीकडे का गेले नाही? असा प्रश्न वाहक चालकांना करण्यात आला. वांगीपर्यंत बस धावत नसल्याचे अखेर उघड झाले. त्यानंतर वाहक व चालकाचे लेखी घेऊन त्यांना समज देण्यात आली. यापुढील काळात नियमित बस वांगीपर्यंत जाईल, असे परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आले. शनिवारी व रविवारी पाथरेवरून वांगीकडे बस जात नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देठे यांनी ‘लोकमत’कडे सांगितले होते. याशिवाय शुटींग काढून पाठपुरावा केला होता. परिवहन महामंडळाचे वाहक, चालक बस वांगीपर्यंत नेत नसल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय चव्हाट्यावर आली होती.कुणाही एका व्यक्तीने मागणी केल्यास बससेवा सुरू केली जाते. त्यानुसार करण्यात आलेल्या मागणीनुसार बससेवा सुरू करण्यात आली. बसच्या चालक व वाहकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून लेखी घेतले आहे. ‘लोकमत’चे कात्रण व त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. यापुढील काळात नियमितपणे बससेवा वांगीपर्यंत सुरू राहील.-विलास गोसावी, राहुरी स्थानक प्रमुख, राहुरी.
त्या बस चालक-वाहकाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:45 PM