अरुण वाघमोडे, अहमदनगर: नगर शहर व परिसरात विविध धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी भेट देण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक देतात. या भाविकांच्या सोयीसाठी महापालिकेने महापालिकेने धार्मिक-पर्यटन स्थळांसाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात फुलसौंदर यांनी म्हटले आहे की, शनिवार व रविवार विविध कार्यालय, कॉलेज, शाळा, औद्योगिक वसाहतीतील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे त्यांचा कल धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देण्याचा असतो. नगर शहरामध्ये व शहराभोवती मेहेराबाद ( अरणगाव ), पिंपळगाव माळवी तलाव, डोगंरंगण, मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड, चांदबीबी महाल, भुईकोट किल्ला, फराहबक्ष महाल, धरमपुरी, मिरावली पहाड, भैरवनाथ देवस्थान, आगडगाव, वस्तू संग्रहालय, आदी धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत. नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळाने पुण्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी १ मे २०२३ पासून पुणे दर्शन नावाने विशेष बससेवा सुरु केलेल्या आहेत. याच धर्तीवर धर्तीवर अहमदनगरमध्ये देखील अशीच बससेवा सुरू करावी अशी मागणी फुलसौंदर यांनी केली आहे.