सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (जि. अहमदनगर) : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग मराठवाड्यात सर्वाधिक आहे. तेथे काही प्रमाणात एसटी बसेसवर दगडफेक झाली. त्यामुळे नुकसान होऊ नये, म्हणून कोपरगाव आगारातून मराठवाड्यात व मराठवाड्यातून विदर्भात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केले आहे. गावोगावी उपोषण व काही ठिकाणी उग्र आंदोलनेही होत आहेत. यातच मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत आंदोलकांनी परिवहन मंडळाच्या बसेसला लक्ष्य केले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोपरगाव आगारातून मराठवाड्यात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द केल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, सोमठाणा, जालना, माहूर, नांदेड या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एकुण दहा ते बारा फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख अमोल बनकर यांनी दिली. मराठवाड्यातून विदर्भात व हैदराबादला जाणाऱ्या बस देखील बंद केल्या आहेत. कुठलीही पूर्व कल्पना प्रवाशांना नसल्याने त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवाशी खासगी वाहनातून जात होते. काही जणांनी आपला प्रवास लांबणीवर टाकला आहे. अहमदनगर जिल्ह्यांतर्गत तसेच पुणे, मुंबई व इतर ठिकाणच्या बसेस सुरू आहेत.फोटो- कोपरगाव बस स्टँड