खते खरेदी करताना संबंधीत विक्रेत्यास आपला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर देणे गरजेचे राहील. कारण कोणत्याही परिस्थितीत एमएफएमएस प्रणालीद्वारेच ऑनलॉईन खत खरेदी व विक्रीचे व्यवहार करणे बंधनकारक आहे. बियाणे खरेदी करताना भेसळीची शंका दूर करण्यासाठी सदर बियाणे सीलबंद असल्याची खात्री करावी. पिशवीवर संपूर्ण तपशील नमूद केला असेल तरच बियाणे खरेदी करावे.
कोणतीही कृषी निविष्ठा खरेदी करताना खरेदीची पावती घ्यावी, सदर पावतीमध्ये खरेदी केलेल्या निविष्ठाचे नाव, वाणाचे नाव, कंपनीचे नाव, बॅच नंबर-लॉट नंबर, उत्पादन तारीख, अंतिम तारीख, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याची सही व शिक्का, खरेदीची तारीख आदी तपशील नमूद केल्याबाबतची खात्री करावी. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर बियाणे पेरणीपूर्वी थोडे बियाणे, बियाणांची बॅग, खरेदीची पावती कापणी होईपर्यंत जपून ठेवावी. यातून भविष्यात सदर बियाणांविषयी काही तक्रार असल्यास न्याय, दाद मागता येईल. कीटकनाशके फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी यांनी पत्रक काढून केले आहे.
...........
तालुका स्तरावर भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत कोणत्याही स्वरूपाची शंका, अडचण, तक्रार असल्यास तालुका स्तरावर पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्षाशी तात्काळ संपर्क साधावा. निविष्ठा खरेदी करताना कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधक नियमांचे पालन करावे.
- प्रवीण गोसावी, सचिन कोष्टी, कृषी अधिकारी.