अण्णा नवथरअहमदनगर : सरकारने खासगी दूध संघांना दणका दिला असून, जिल्ह्यातील सहा खासगी , तर सहकारी सात दूध संघावर शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध संघांचे धाबे दणाणले आहेत.गेल्या १ आॅगस्टपासून दूधाला प्रति लिटर ५ रुपये आनुदान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा दुग्ध विकास अधिकारी कार्यालयामार्फत शासकीय आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. २० हजार लिटरहून अधिक दूध संकलन करणा-या दूध संघांवर शासकीय अधिका-यांची नियुक्त करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात २० हजारांहून अधिक दूधाचे संकलन करणारे अंदाजे ७० दूध संकलन केंद्र आहेत. त्यापैकी मोठ्या १३ प्रकल्पांवर शासकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दूध संघांकडून शासन नियमाप्रमाणे भाव दिला जातो किंवा नाही, यावर शासकीय अधिका-यांची लक्ष ठेवून आहेत. तसेच दररोज संकलित होणारे दूध किती आहे, त्याचा हिशोब कसा ठेवला जातो, याची तपासणीही केली जात आहे. उर्वरित दूध सघांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फिरती पथके नियुक्ती करण्यात आले आहेत़ दूधाला प्रति लिटर २५ रुपये, याप्रमाणे भाव देणे बंधनकारक आहे. त्यापैकी शासकीय आनुदानापोटी दूध संघांना ५ रुपये मिळतील. त्यासाठी त्यांना सरकारी पोर्टलवर माहिती भरणे बंधनकारक आहे.प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला दुधाचे पेमेंट उत्पादकांना केले जाणार असून,त्यानंतर दूध संघांना आनुदानाची रक्कम शासानकडून अदा केली जाईल. दूध उत्पादकांच्या खात्यावर २५ रुपये जमा होतात किंवा नाही, याची खात्री केली जाणार आहे. त्यासाठी दूध उत्पादकांच्या बँक उतारेही प्रशासनाकडून मागविण्यात आले आहेत. शासकीय दरानुसार दूध संघाने दूधा भाव न दिल्याचे आढळून आल्यास दूध संघांवर थेट शासनाकडून कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात दररोज २४ लाख ६० हजार लिटर दुधाचे संकलन होते. सर्वाधिक १७ लाख दूधाचे संकलन खासगी दूध संघामध्ये होते. शासनाच्या नव्या नियमानुसार त्यावर नियंत्रण आले आहे.कमीत कमी दुधाला २५ रुपये दर निश्चित झाला असून, आनुदानाची रक्कम दूध संघाच्या बँक खात्यावर जमा होईल. आनुदान जमा करण्यासाठी खास सॉप्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे.या संघावर प्रशासकांची नियुक्तीप्रभात, मळगंगा, व्हीआरीएस, पतंजली, फे्रश अॅण्ड नॅचरल, एसआर थोरात, संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, राहुरी तालुका सहकारी दुध संघ, गोदावरी खोरे सहकारी दुध संघ, या संघांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सरकारी नियंत्रणाखाली दूध खरेदी : दूध संघांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 10:59 AM