अहमदनगर : कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा कारागृह अधीक्षकांना एका तोतयाने फोन करून मुख्यमंत्र्यांचा पीए बोलत असल्याचे सांगत कोपर्डीच्या दोषींना तत्काळ येरवडा कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला. त्याबाबत शनिवारी जिल्हा कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात तोतया व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली.कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर २९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता जिल्हा कारागृह अधीक्षकांना एक फोन आला़ ‘मी मुख्यमंत्र्यांचा खासगी पीए बोलतोय’, असे सांगत तिन्ही आरोपींना फाशी झाली असून, त्यांना येरवडा कारागृहात पाठविण्याचे फर्मान सोडले. पुन्हा जरा वेळाने फोन करून ‘एसपी बोलतोय’ असे सांगत तोच निरोप दिला. रात्री आठ वाजता त्याच व्यक्तीने पुन्हा फोन करून ‘पोलीस महासंचालक बोलतोय’ असे सांगत येरवडा कारागृहात आरोपींना तातडीने वर्ग करा. तेथेच ते सुरक्षित राहतील असे सांगितले़ हा फोन तोतया व्यक्तीकडून येत असल्याचे कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आले़ शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.फोनचा उद्देश काय?कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा कारागृह प्रशासनाने २९ नोव्हेंबरला रात्री तिनही दोषींना येरवडा कारागृहात वर्ग केले़ सकाळी दोषींनी न्यायालयात आणतानाही मोठी खबरदारी घेतली होती़ कारागृहात मुख्यमंत्र्याचा पीए आणि अधिकाºयांचे नाव घेऊन फोन करून आरोपींना येरवड्यातच पाठवा असे सांगण्यात तोतयाचा काय उद्देश होता? याचा पुढील तपास पोलीस करत आहेत़
मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या नावाने तोतयाचा फोन, कोपर्डीच्या दोषींना येरवड्यात हलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:44 PM