घारगाव (अहमदनगर) - मोबाईल लुटणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने अटक केली. शुक्रवारी (दि.२८) रात्री नारायणगाव परिसरात पथकाने ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून मोबाईल व एम.एच.१५, जी.एफ.७२८८ या क्रमांकाची कार जप्त करण्यात आली आहे.
प्रशांत अण्णासाहेब जाधव (वय २३), सचिन जयराम पवार, (वय ३०), शिवतेज चंद्रहर्ष नेहे (वय २६) तिघेही रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर अशी पथकाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावर अहमदनगर-पुणे सीमेवर आळेखिंड परिसरात १९ जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सचिन रमेश सानप (रा. रूम नं.७०६, फेज १ विस्पलिंगमोबाईल सोसायटी, बाणेर, पुणे) हे पाऊस आल्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून मोबाईल पॅन्टच्या खिशामध्ये ठेवत असताना त्याच दरम्यान कारमधून आलेल्या दोघांनी खाली उतरत एकाने सानप यांचा मोबाईल खिशातून काढून घेतला. दुसरा दुचाकी ओढून नेण्याचा प्रयत्न करत असताना सानप यांनी आरडाओरडा केल्याने ते दुचाकी सोडून मोबाईल घेऊन पसार झाले. याबाबत सानप यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.
दरम्यान, जबरी चोरी व गंभीर गुन्हे उघडकीस आणणे कामी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक वरील गुन्ह्याचा तपास करत असताना पथकाला मोबाईल लुटणारे नारायणगाव परिसरात असल्याचे गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने वरील तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून मोबाईल व कार जप्त करण्यात आले असून त्यांना आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली.