श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्यात दूध भेसळीमुळे कॅन्सरचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने त्यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे भेसळखोरांची गय केली जाणार नाही, असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी दिला.
महानिरीक्षक पाटील हे श्रीरामपूर येथे सोमवारी उशिरा शहर पोलिस ठाणे, तसेच उपअधीक्षक कार्यालयाच्या तपासणीसाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा पोलिसप्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. स्वाती भोर, उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे, निरीक्षक हर्षवर्धन गवळी उपस्थित होते. शहर पोलिस ठाण्यातील प्रत्येक कक्षाची महानिरीक्षक पाटील यांनी बारकाईने पाहणी केली. कामकाजाची त्यांनी माहिती घेतली.
शेखर पाटील म्हणाले, राज्यातील दुधाचे उत्पादन आणि एकूण संकलन पाहता मोठी तफावत आहे. उत्पादनापेक्षा संकलन दुपटीने होत आहे. याचा अर्थ दुपटीने भेसळ होत आहे. भेसळखोरांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर ‘मोक्का’ची कारवाई करू. नाशिक परिक्षेत्रामध्ये नगर जिल्ह्यात ‘मोक्का’ आणि ‘एमपीडीए’च्या सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत.
नगर जिल्हा हा विस्ताराने खूप मोठा आहे. येथे गेली अनेक वर्षे नव्याने पोलिस ठाणे प्रस्तावित आहेत. मात्र, त्या तुलनेत नवीन पोलिस बळ प्रशासनाला मिळत नाही. त्यामुळे अपुऱ्या पोलिस फौजफाट्यासह काम करावे लागते. त्याचा कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो. इतर जिल्ह्यांना ज्याप्रमाणे पोलिस बळ मिळाले, त्या तुलनेत नगरला मिळाले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.