दहिगावने : यंदाच्या ऊस गळीत हंगामात बहुतेक कारखाना व्यवस्थापनाचे तोडणी आणि कामगारांवर हवे तितके नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे ऊस गाळपास घालताना शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केली जात आहे. शेतकऱ्यांना एक एकर ऊसतोडणीसाठी सरासरी २ ते ४ हजार रुपये कामगारांना द्यावे लागत आहेत. शेतातील उभे पीक अगोदर पेटवून देऊन (गुलाची काडी) नंतरच तोडणी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे भावीनिमगाव (ता.शेवगाव) व परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
यावर्षी खरीप हंगामातील पिकांची अतिवृष्टीमुळे नासाडी झाली. कापसाच्या उताऱ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली. एकरी ९ते१२ क्विंटल कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरासरी ४ ते ७ क्विंटलवर समाधान मानावे लागले. कापसानंतर ऊस हेच शेतकऱ्यांच्या हातातील प्रमुख नगदी पीक आहे. त्यावर शेतीचे अर्थकारण अवलंबून असल्याने लवकर ऊसतोडणी मिळावी ही प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे. मात्र १५ ते १७ महिन्यांचे झालेले ऊस पीक तोडण्यास ऊसतोड कामगार आले की अगोदर एकरी ३ ते ५ हजारांपर्यंत रक्कम द्यावी लागते. अन्यथा कामगार उसतोडणीस सुरुवातच करत नाहीत. शिवाय ऊस अवास्तव पडल्याने त्यावर वेलवर्गीय वनस्पतींचे जाळे तयार झाल्याचे कारण सांगत ऊस तोडता येणार नाही म्हणून अगोदर शेतातील उभा ऊस पेटवून द्यायचा आणि मग तोडणी करायची असेही प्रकार घडत आहेत. ऊस पेटवून दिल्यामुळे सरासरी १० ते १५ टक्के वजनात घट येत असल्याचे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यात आणखी भर म्हणजे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर शेताबाहेर काढून पक्क्या रस्त्यापर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी एक ट्रॅक्टर उपलब्ध करून द्यावा लागतो. या अतिरिक्त ट्रॅक्टरसाठीही प्रत्येक खेपेला २०० ते ५०० रुपये शेतकऱ्यांना अधिकचे मोजावे लागत आहेत.
----
अर्धा एकर ऊस तोडण्यासाठी १ हजार रुपये मजुरांना, वाहतूक करणाऱ्या गाडी चालकास १०० रुपये खेपेप्रमाणे चार खेपांचे ४०० रुपये, ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर शेताबाहेर काढून पक्क्या रस्त्यापर्यंत नेण्यासाठी भाड्याने लावलेल्या ट्रॅक्टरला २०० रुपये खेपेप्रमाणे चार खेपांचे ८०० रुपये द्यावे लागले. शिवाय उभा ऊस पेटवून दिला मग ऊस तोडल्या गेला. येत्या काळात इतरांचेही असेच होऊ नये, ही माफक अपेक्षा आहे.
-भागवत मुंगसे,
ऊस उत्पादक, भावीनिमगाव
---
१३ भाविनिमगाव
भावीनिमगाव परिसरात ऊस तोडण्याच्या अगोदर उभ्या पिकाला पेटवून दिले जात आहे.