तिसगाव ( जि. अहमदनगर) : पाथर्डी येथील वन परिक्षेत्र हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या पकडण्यात वनविभागाला गुरुवारी पहाटे यश आले आहे. बिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दर्याचे वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.
पहाटे तीन वाजेनंतर जेरबंद झालेल्या बिबट्याने पिंज-यातील बोकडाचा जवळपास निम्म्याने सकाळपर्यंत फडशा पाडला. बिबट्या शोध मोहीम कामी अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीडची पथके पाच दिवसांपासून अहोरात्र कार्यरत होती. गुरुवारी पहाटे आष्टी वन परिक्षेत्र हद्दीत भक्ष्याच्या शोधार्थ सावरगाव सटवाई दर्याचे पठारावर बिबट्या आला होता.
पिंजऱ्यातील बोकडाचा फडशा पाडतानाच पिंजऱ्याचा दरवाजा बंद होऊन तो जेरबंद झाला. शिरापूर डोंगराच्या माथ्यावर सावरगाव (ता. आष्टी) वन विभागाची हद्द आहे. शिरापूर, पानतासवाडी, करडवाडी, सटवाईदरा ओढा, गाढवदरा परिसरात बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून वावरत होता. दरम्यानचे काळात त्याने गर्भगिरीतील अनेक रानडुकरांचा फडशा पाडला. भक्ष्याची वानवा झाल्याने तो मानवी वस्त्याकडे वळला होता.
या बिबट्याने आठ दिवसात तीन मुलांना ओढून नेले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता.