पारनेर : बारावीचे महत्त्वाचे वर्षे म्हणून आम्ही पैसे देऊन खोल्या घेतल्या. आता पैसे देऊन राहाणे आम्हाला परवडत नाही. वसतिगृह सुरू करा, अशी मागणी पारनेर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहांमधील मुलींनी केली आहे.
कोरोना काळात सामाजिक न्याय विभागाचे पारनेर येथील मुलींचे वसतिगृह ताब्यात घेतले होते. तेथे रॅपिड टेस्टसह कोरोना रुग्ण उपचार केंद्र होते. रुग्ण कमी झाल्यानंतर हे केंद्र बंद करण्यात आले. त्याच दरम्यान नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे त्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश मिळेल, असा विश्वास होता. मात्र, कोविड सेंटरमुळे वसतिगृह सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात दिले नाही. त्यामुळे पारनेर शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची वसतिगृहाअभावी गैरसोय झाली.
सोमवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्या मुलींबरोबर संवाद साधला. तीन - चार महिने झाले. आम्ही भाडे देऊन खोली घेऊन राहतो. जेवणाची व्यवस्था नाही. आता आम्हाला असा खर्च परवडत नाही, असे विद्या खैरे, सोनल पंडित, वृषाली उदार, प्रियंका वैरागर सांगत होत्या. आमची वसतिगृहात व्यवस्था झाली नाही तर पालक आमचे शिक्षण बंद करून घरी बोलावतील. पण आम्हाला शिकायचे आहे, असे संपदा पारधी, संजना कापरे सांगत होत्या. आमच्या कपाटामधील अनेक वस्तू, कागदपत्रे हरवल्याचे काही मुलींनी सांगितले.
---
नगर जिल्ह्यात पारनेर तालुकावगळता सर्व तालुक्यात सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह पुन्हा ताब्यात देण्यात आली आहेत. पारनेरचे वसतिगृह सुरू नसल्याने मुलींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पारनेर तहसीलदार यांनी कोरोना केंद्र दुसरीकडे सुरू करून तातडीने मुलींचे वसतिगृह सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात द्यावे.
राधाकिसन देवढे,
सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, नगर
---
कोरोना रुग्ण पुन्हा वाढत असल्याने शासकीय मुलींचे वसतिगृह येथे आम्हाला कोविड सेंटर करावे लागणार आहे. दुसरीकडे कुठे जागा उपलब्ध करणार हा प्रश्न आहे.
-सुधाकर भोसले,
प्रांताधिकारी, पारनेर - श्रीगोंदा
---
०३ पारनेर वसतिगृह
सामाजिक न्याय विभागाच्या पारनेर येथील मुलींच्या वसतिगृहाला नगरच्या सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त राधाकिसन देवढे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुलींबरोबर चर्चा केली.