कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील हिंगणी बंधाऱ्यावरील अरूंद रस्त्यावर कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे पाण्यात पडले. पैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शांताराम बाबुराव आहेर (वय ५०, रा. धारणगाव, ता. कोपरगाव) व बाळासाहेब यशवंत रणशूर (वय ५६, रा.मुर्शतपुर, ता. कोपरगाव ) हे दोघे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हिंगणी येथून मुर्शतपूरकडे येत होते. हिंगणी बंधाऱ्यावरून येत असताना अरूंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात आहेर व रणशूर दोघे बंधाऱ्यातील पाण्यात पडले.
स्थानिक मच्छीमार व नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. शांताराम आहेर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघांनाही कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी आहेर यांना मयत घोषीत केले. तर जखमी रणशूर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी पंचनामा केला. बंधाऱ्यावरील पुलाला कठडे नसल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.