शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथील पोलिस निवारा कक्षामध्ये लावण्यात आलेल्या अपघातातील एका कारने सोमवारी अचानक पेट घेतला. रस्त्यावरील प्रवाशांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आली.
सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. एका अपघातातील ही कार (एमएच २०, बीक्यू ५०५५) पोलिस निवारा कक्षामध्ये दहा दिवसांपासून लावण्यात आलेली होती. या अपघातातील जखमी व्यक्ती हे वैद्यकीय उपचार घेत असल्याने वाहन नेण्यासाठी ते येऊ शकलेले नाही. सकाळी गाडीमधून थोडा धूर बाहेर येत असल्याचे रस्त्यावरील महिला प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती अन्य प्रवाशांना दिली. त्यांनी पाणी उपलब्ध करत ही आग विझविली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहनाच्या सीट कव्हरने पेट घेतल्याने आगीचा डोंब निर्माण झाला होता. घटनेची माहिती समजताच पोलिस हवालदार संतोष परदेशी व प्रवीण कांबळे तेथे दाखल झाले.