संगमनेर : महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर आता ‘माझा जीव, माझीच जबाबदारी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. जनतेला सल्ले देण्यापेक्षा ‘प्रवरे’प्रमाणे व्यवस्था उभी केली असती तरी कोरोनाच्या संकटात संगमनेर तालुक्याला दिलासा मिळाला असता. अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.
संगमनेर तालुक्यातील निमोण येथे पुष्पगंध सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि. ८) आमदार विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना विखे म्हणाले, सरकारच्या घोषणा आणि नियोजन फक्त कागदावर राहिले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या घोषणेचे काय झालेॽ महाविकास आघाडी सरकारची कोणतीच यंत्रणा मदतीला नाही. या संकटात लोकांना मदत करून आधार देण्याची गरज होती. मात्र, मंत्री फक्त दौरे करून काळजी न करण्याचे सल्ले देताना दिसतात. त्यांच्या बैठकांचा केवळ फार्स सुरू आहे. सरकारी यंत्रणेचे सोडा, जिल्ह्यातील मंत्र्यांनी स्वत:हून नागरिकांसाठी काय केले? सरकारमधील लोकांची इच्छाशक्ती संपली आहे. त्यामुळेच सामाजिक संस्था आणि तरुण कार्यकर्ते जनतेला आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. गावागावांत उभारलेले कोविड हेल्थ केअर सेंटरच आता सामान्य माणसाला आधार ठरतील, असेही विखे म्हणाले.
-----------------
तेव्हा समाजातील तरुण पुढे येतात
सरकारची व्यवस्था जेव्हा अपयशी ठरते तेव्हा समाजातील तरुण धैर्याने पुढे येऊन सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करतात. हीच खरी ईश्वरसेवा आहे. कोरोना संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आताच रुग्णांना बेड मिळत नाही, इंजेक्शन जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली आहे. काही खासगी रुग्णालयात कंपाउंडर आता सल्ले देऊन रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना घाबरवत आहेत. सरकारची कोणतीच व्यवस्था नसल्याने सामान्य माणसाला खासगी रुग्णालयांचा आश्रय घ्यावा लागल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट मोठे उभे राहिले.