पाथर्डी : आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवास्थानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी(४ आॅगस्ट) मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आघाडीचे राज्य महासचिव किसन चव्हाण यांच्यासह ३३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
आमदार मोनिका राजळे यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील नोकरशाहीवर अंकुश राहिला नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेधार्थ कासार पिंपळगाव येथील आमदार राजळे यांच्या निवासस्थानावर वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी मोर्चा काढला होता.
पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आघाडीचे राज्य संघटक प्रा. किसन चव्हाण, अरविंद सोनटक्के, भोरू उर्फ रवींद्र नामदेव म्हस्के, छानराज क्षेत्रे, प्रकाश बाप्पू भोसले, प्यारेलालभाई शेख, सलीम जीलियानी शेख, सुनील जाधव यांच्यासह ३३ अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.