ब्राम्हणी : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लॉकडाऊनच्या व सुटीच्या कालावधीत रात्रीच्या वेळी परिसरातील साहित्याची अज्ञातांकडून तोडफोड सुरू आहे. याबाबात मुख्याध्यापक व शाळा समितीच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जिल्ह्यात ब्राम्हणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक गुणवत्ता टिकवून आहे. सर्वाधिक मोठा परिसर असलेल्या शाळेत गतवर्षी बदलून आलेल्या शिक्षकांनी परिश्रम घेत वर्ग डिजीटल केले. विविध शोभेची झाडे लावली. पाण्यासाठी पाईपलाईन केली.मात्र, काही विध्वंसक वृत्तीच्या लोकांकडून सरस्वतीचे पवित्र ज्ञानमंदिर समजल्या जाणाºया शाळेत धुडगूस घातला जात आहे. यापूर्वी रात्रीच्या वेळी नको त्या गोष्टी शाळेच्या परिसरात सुरू आहे. याबाबत शिक्षकांनी वारंवार शिक्षण समिती व जागृत पालकांकडे तक्रार केली. मात्र,अद्याप गैरप्रकार थांबला नाही. अखेर मुख्याध्यापक रामदास कोरडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष काकासाहेब राजदेव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारीचा पाढाच वाचला. शनिवारी अखेर (२ मे ) झालेल्या नुकसानीचे फोटो दाखविण्यात आले. मुख्याध्यापक रामदास विष्णू कोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वर्गातील साहित्याची उचका पाचक केली. पाईपलाईनवर दगड टाकून फोडण्यात आली. विविध प्रकारची लावलेली झाडे उपटून फेकून देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पालकातून निषेध व्यक्त होत आहे.
ब्राम्हणी शाळेत अज्ञातांकडून साहित्याची तोडफोड गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 10:52 AM