अहमदनगर : राज्यात तलाठी भरती पारदर्शकपणे झालेली असून, काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुणांत वाढ दिसत आहे. याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. मात्र, ही संधी साधून विरोधक बेछूट आरोप करत आहेत. अशांविरोधात बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करू, अशा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला.
तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून व स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून होत आहे. निकालातील गुणांत मोठी तफावत आहे. अनेक विद्यार्थ्यांना २०० पैकी २०० हून अधिकचे गुण मिळाले आहेत. त्यामुळे ही तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षा दिली. टीसीएस कंपनीमार्फत ही परीक्षा झाली. यात काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे किंवा कठीण असल्याचे पुढे आल्यानंतर सामान्यीकरण पद्धतीतून ती दुरुस्ती करण्यात आली. या प्रश्नांना सरसकट गुण दिल्याने काहींचे गुण २०० पेक्षा जास्त दिसत आहेत. यापूर्वीच्या जेवढ्या काही परीक्षा झाल्या, त्यातही सामान्यीकरणाची पद्धत वापरलेली आहे. ते काही नवीन नाही. ४८ विद्यार्थ्यांना २०० पैकी जास्त गुण मिळाले, हे आम्ही जाहीर केलेले आहे. लपवून ठेवले नाही. गुण जास्त दिसत असले तरी त्याच मेरीटप्रमाणे नियुक्ती दिली जाईल.
मात्र, दुसरीकडे सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांचे बेछूट आरोप सुरू आहेत. भरतीसाठी सरकारने पैसे घेतल्याचे आरोप काहीजणांनी केेले. त्यांनी ते आरोप सिद्ध करावेत. सर्व खुलासे आम्ही देऊ. सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. मात्र, आरोप चुकीचे आढळले, तर संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला. राऊत यांच्या डोक्यावर परिणामशिवसेनेचे खासदार सुनील राऊत यांच्या आरोपांबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की, राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे. खासगी आरोप करून त्यांनी अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचीही यादी आम्हाला काढावी लागेल.