कोपरगाव (जि. अहमदनगर ): शहरातील गुरुद्वारा रोडवर असलेल्या खर्डे कॉम्प्लेक्स जवळ उभ्या असलेल्या स्कुटीच्या डीक्कीचे लॉक तोडून डीकी मध्ये असलेली साडेसात लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी (दि.४) घडली आहे. त्यानंतर चोरट्यांनी स्कुटी शहरातील टिळकनगर जवळील सार्वजानिक शौचालयाजवळ उभी करून पसार झाले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुचाकी पळून नेताना चोरटा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
विकास मोहन आव्हाड (रा. शुकलेश्र्वर मंदिराजवळ बेट,कोपरगाव) हे गुरुवारी दुपारच्या सुमारास आपली एक्सेस स्कुटी (क्र.एम. एच.१७ सी. क्यू.२१८६) या स्कूटरच्या डीक्कित जमीन खरेदीसाठी साडेसात लाख रुपये घेउन गुरुद्वारा रोड येथील खर्डे कॉम्प्लेक्स जवळ जमीन खरेदीचे दस्तावेज बनवण्यासाठी थांबले होते. गाडी रस्त्यावर उभी करून ते त्याठिकाणी असलेल्या एका दुकानात दस्तावेजचे कामकाज करत असताना अज्ञात इसमाने त्यांची दुचाकी त्या ठिकाणहून पळून नेत टिळकनगर जवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ उभी करून डीक्कीचे लॉक तोडून त्याच्यातील साडेसात लाखांची रोकड लंपास करून गाडी त्या ठिकाणी सोडून पसार झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व्हिडिओ चित्रीकरणाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचा काम शहर पोलिसांकडून सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करत आहे.