नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील खडका फाटा येथील टोलनाक्यावर गुरुवारी रात्री एका कारमधून एक लाख रुपये रोख व एक रिव्हॉल्वर नेवासा येथील आचारसंहिता कक्षाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जप्त केली आहे. औरंगाबादकडून पुणेकडे जाणारी फॉरचूनर गाडी क्र.एम.एच.४३, ए.आय.-००१३ मधून सदर रक्कम व एक रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली. या गाडीला स्थिर सर्वेक्षण पथकाचे एस.डी.कराळे यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल चांगदेव कांबळे, जी.एस.चव्हाण, नितीन भताने यांनी गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास सदर कार अडवून तपासणी केली. यावेळी कारमध्ये एक लाख रुपयांची रोकड आढळून आली. कारमधील दोघांची झडती घेतली असता त्यातील एकाकडे एक रिव्हॉल्वर सापडले आहे. या घटनेनंतर पथकाने निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे, तहसीलदार रुपेश सुराणा, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख यांना बोलवले. घटनेचा खडकाफाटा येथील टोलनाका येथे पंचनामा केला असून सदर रक्कम व रिव्हॉल्वर पथकाने जप्त केली आहे.
नगर-औरंगाबाद महामार्गावर रिव्हॉल्वरसह रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:34 AM