शिर्डी : जातनिहाय जनगणना ओबीसींच्या आरक्षणाची गुरूकिल्ली असल्याचे मत जेष्ठ विचारवंत व ओबीसींचे नेते प्रा. हरी नरके यांनी शिर्डीत व्यक्त केले. ओबीसी आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी व माजी मुख्यमंत्री फडणवीसांकडून फसवणूक सुरू आहे. २०११ मध्ये केलेली विशेष जनगणना केंद्र देत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या आरक्षण प्रश्नावर फडणवीसांनी आपल्याशी जाहीर चर्चा करावी, असे थेट आव्हान नरके यांनी दिले.
फडणवीसांनी आपल्या दहा प्रश्नांची उत्तरे दिल्यास सत्य जनतेसमोर येईल, असा दावा करत नरके यांनी उपस्थितांसमोर विविध पुरावे सादर केले. सध्या ओबीसींसह संवेदनशील बनलेल्या विविध आरक्षणासंदर्भातील सत्य आणि तथ्य पदाधिकाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात नरके यांच्यासह जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले. यावेळी समता परिषदेचे बापुसाहेब भुजबळ, मच्छिंद्र गुलदगड, अंबादास गारुडकर, प्रशांत शिंदे, सुभाष लोंढे, किशोर बोरावके, साहेबराव निधाने, डॉ. किसन गाडेकर, राजेंद्र पठारे, सुभाष गायकवाड, डॉ. जमधडे, ॲड. अविनाश शेजवळ, सिमोन जगताप, देवराम सजन, उत्तम सजन, आदिनाथ शिंदे आदींची उपस्थिती होती.
विस्मृतीत गेलेल्या ओबीसींचे पुनर्जागरण करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जातनिहाय जनगणनेमुळे ओबीसींची मोठी आकडेवारी समोर येईल. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत, तशी मागणी करणारांचे तोंड दाबवण्याचा प्रयत्न होत आहे. ही फॅसिझमची नांदी असल्याची टीका रावसाहेब कसबे यांनी केली.
आरक्षण हा आपला हक्क असून ती कुणाची मेहरबानी नाही. यांत्रिकीकरण व खासगीकरण आरक्षणाच्या मुळावर उठले आहे. खासगीकरणानंतर आरक्षण कसे मिळेल, असा सवाल उत्तम कांबळे यांनी व्यक्त केला. ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी आदी पिढ्यानपिढ्या शुद्र, अतिशुद्र समजल्या जाणाऱ्या घटकांतील पोटजाती आपल्याला एक होऊ देत नाही. या जातींना मूठमाती देऊन एकत्र येण्याचे आवाहन कांबळे यांनी केले.