पाच जणांच्या टोळीतील चौघांना पोलिसांनी पकडले असून एक जण पळून गेला. त्यांच्याकडील मोबाइल, दोन दुचाकी वाहने व दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.
जालिंदर मच्छिंद्र बर्डे (वय ३०), गणेश मच्छिंद्र गायकवाड उर्फ अजय (वय २३) (दोघेही रा. गुहा, ता. राहुरी), लखन अर्जुन पिंपळे (वय ३०, रा. दोडरवीरनगर, ता. सिन्नर, जिल्हा. नाशिक), सोमनाथ अर्जुन पवार (वय २१, रा. बाजार वाकडी, ता. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची तर अशोक हरिभाऊ बनवटे (रा. श्रीरामपूर, मूळ. रा. कोतूळ, ता. अकोले) असे पळून गेलेल्याचे नाव आहे. त्यांच्याविरोधात पोलीस शिपाई ज्ञानेश्वर दत्तात्रय सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे पोलीस पथकासह गस्तीवर असताना त्यांना अकोलेकडे जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरील उड्डाणपुलाखाली अंधारात चार ते पाच जण संशयितरित्या उभे असल्याचे दिसले. पोलीस येत असल्याचे पाहून त्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली. दरोड्याच्या तयारीतील सर्वजण पळून जात असताना त्यातील चार जणांना पाठलाग करून पकडले. तर बनवटे हा पळून गेला.
त्यांच्याकडील सॅकमधून दगडे, मिरची पूड, मोबाइल फोन, दरोड्याचे इतर साहित्य तसेच दोन दुचाकी वाहने (एमएच १७- एडी ७३५४, एमएच १२-सीडब्ल्यू ४२९२) पोलिसांनी जप्त केली. पोलीस निरीक्षक देशमुख यांसह पोलीस हेड कॉस्टेबल अमित महाजन, पोलीस नाईक विजय खाडे, पोलीस शिपाई सचिन उगले, अविनाश बर्डे, ज्ञानेश्वर सोनवणे, सुरेश मोरे आदींचा या कारवाईत समावेश होता.