राशीन : करमाळा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानाचे (रेशनिंग) धान्य राशीनहून काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असलेले दोन टेम्पो कर्जत पोलिसांनी पकडले. यावेळी तिघांना अटक करण्यात आली.
यावेळी ८२ गोण्या तांदूळ, ८ गोण्या गहू आणि दाेन टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. मंगळवारी दुपारी २ च्या दरम्यान राशीन-करमाळा रस्त्यावर ही कारवाई केली. बाळासाहेब दादासाहेब ढेरे (वय २५), रेवणनाथ मुरलीधर ढेरे (वय ३९) व श्रीकांत प्रकाश ढेरे (वय २५) सर्व रा. वीट, ता. करमाळा या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, संभाजी वाबळे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, देवीदास पळसे, शाहूराज तिकटे यांनी केली.