कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू करत संचारबंदी केली आहे; मात्र बहुतांश जण विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. अशा बेफिकीर लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने नगर शहरासह जिल्हाभरात रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी अनेक हुल्लडबाजांचे वाहने जप्त केली आहेत. १ मे पर्यंत ही वाहने पोलीस ठाण्यातच ठेवली जाणार आहेत.
---------
पोलिसांनी पकडताच शुल्लक कारणांचा पाढा
रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी पकडताच अनेक जण वेगवेगळी कारणे सांगतात, किराणा संपला, भाजीपाला नाही, डोकं, पोट दुखीची गोळी आणायला चाललो होतो. आजारी नातेवाईकांना भेटायला जात होतो. अशी एकसे बढकर एक कारणे पोलिसांना सांगितली जात आहेत. ज्यांना अत्यावश्यक काम आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत मात्र जे विनाकारण फिरतात त्यांच्यावर सध्या जिल्हाभरात कडक कारवाई सुरू आहे.
----------
रात्री उशिरापर्यंत कारवाई
कारवाईसाठी नगर शहरात बारा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील चौकाचौकात ही पथके तैनात करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.
----------
फोटो १९ कारवाई
नगर शहरात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.