अकोले : ‘दिन दिन दिवाळी गाय, म्हशी ओवाळी’या पारंपरिक गीताच्या साथीने ग्रामीण भागात शेतक-यांनी गाय व वासराची पूजा करुन वसुबारस साजरी केली. आदिवासी भागात प्रथेप्रमाणे वाघबारस साजरी झाली अन् दिवाळीला सुरुवात झाली. अकोले शहरातील गुरुवारचा बाजार मतमोजणीमुळे शुक्रवारी भरवण्यात आला होता. दिवाळीची खरेदी त्यात पावसाची रिपरिप यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी अकोलेकरांनी अनुभवली.आदिवासी भागातील चालीरीतीप्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’ होय. वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा हा दिवस असून तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा उत्सवाने जपली जात आहे. आदिवासी बांधवांनी वाघाला देव मानले असून गावाच्या वेशीला वाघ्याच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते. एकत्र नवसपूर्ती केली जाते. जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांचे गाई गुरांचे रक्षण व्हावे यासाठी नैवेद्य दाखवला जातो. तसेच काही भागात डांगर, तांदळाच्या खिरीचा गोड नैवेद्यही दाखवला जातो.अकोले तालुक्यातील म्हैसवळण घाट, घाटघर कोकणकडा, पिंपरकणे, बिताका, शेणीत, खिरविरे, रतनवाडी, घाटघर, हरिश्चंद्रगड पायथा, पेठ्याची वाडी, देवगाव, झुल्याची सोंड अशा बहुतांशी ठिकाणी वाघोबाची वा वाघदेवाची मंदिरे आहेत. तर काही ठिकाणी लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून त्यावर शेंदूर लावून ती या ठिकाणी ठेवलेली आढळतात. पेठेच्या वाडीजवळील भैरवनाथाच्या कलाड गडावर गावकरी जातात. नैवेद्य दाखवितात. पाचनई जवळ कोड्याच्या कुंडातील झ-याजवळही अशाच पद्धतीने वाघबारस साजरी होते. वाघबारसेच्या दिवशी येथील प्रत्येक घरातून नैवेद्य द्यावा लागतो. वाघबारसला गुराखी प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करून संध्याकाळी गावातील सर्व गुरे वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणतात. गावातील जाणकार मंडळी, मुले, मुली एकत्र येतात. वाघोबाच्या मंदिराच्या संपूर्ण परिसरात गाईच्या शेणाचा सडा व गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केली जाते. रांगोळी व फुलांच्या माळा लावल्या जातात. देवांना शेंदूर लावला जातो. गावातील मारुती व गावदेवाच्या देवळासमोर शेकोटी पेटविली जाते. गुराखी मुले वाघ, अस्वल, कोल्हा अशी रूपे घेऊन खेळ खेळतात. गोठ्याच्या बाहेरही रांगोळी काढली जाते. तेलाचा किवा तुपाचा दिवा लावला जातो. सर्व प्राण्यांची पूजा केली जाते. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य खाऊ घातला जातो. आदिवासी तरुण व तरूणी एकत्र जमून तारपक-याच्या तालावर नाचतात.
अकोलेच्या आदिवासी भागात वाघबारस साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:41 PM