शायर हा आपल्या शायरीतून फक्त प्रेम, शराब, मैखाना अशाच गोष्टींचा ऊहापोह करतो, हा जनसामान्यांचा समज आहे. आजच नाही तर जुन्या काळापासून आपण अभ्यास केला, तर सर्व शायरांनी मनुष्याच्या जीवनात घडणाऱ्या व समाजात घडणाऱ्या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडले आहे. मिर्जा गालिब यांच्याबाबत विचार केला, तर त्यांनी स्वतंत्र्यपूर्ण काळात देशातील स्थितीवर, लोकांच्या समस्यांवर शायरी केली; पण लोकांनी त्यांच्या फक्त प्यार, मोहब्बत, शराबच्या शायरीलाच जास्त पसंत केल्यामुळे त्यांच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहण्यात येऊ लागले. खरं तर मिर्जा गालिब यांनी जीवनातील प्रत्येक बाबीवर आपल्या कवितेच्या माध्यमातून वास्तव मांडले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव उर्दू कवयित्री डॉ. कमर सुरूर यांनी केले.
मखदुम सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने मिर्जा गालिब यांच्या जयंतीनिमित्त गोविंदपुरा येथील मखदुम कार्यालयात शेरीनशिस्तचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. कमर सुरूर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हूणन उर्दू कवयित्री नफिसा हया होत्या. या नशिस्तमध्ये डॉ. कमर सुरूर, सलीम यावर, नफिसा हया यांनी आपल्या शायरी सादर केल्या. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आबीद दुलेखान यांनी मानले.