केडगाव : कोरोनाच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेनंतर शाळा सुरू होतील की नाही, याची चिंता असतानाच, आदर्शगाव हिवरेबाजारने गाव कोरोनामुक्त करून, १५ जूनपासून शाळा नियमित सुरू करण्याचे धाडस केले. याला आता शंभर दिवस होत आले असून, या निमित्ताने ‘शंभर दिवस शाळेचे’ हा उपक्रम सोमवारी (दि.२७) हिवरेबाजार (ता.नगर) येथे राबविण्यात येणार आहे.
यंदाचा एप्रिल-मे महिना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी भयावह ठरला. जेव्हा घराच्या बाहेर निघण्याची भीती वाटत होती, तेव्हा आदर्शगाव हिवरेबाजारने गाव कडक नियमावली लागू करून कोरोनामुक्त केले. त्यानंतर, शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच राज्यातील सर्व शाळा कडकडीत बंद असताना, हिवरेबाजारने धाडस करीत इयत्ता पहिली ते दहावीचे नियमित वर्ग सुरू करून शाळा सुरू केली. नियमावलीचे पालन झाल्याने शाळा शंभर दिवस अखंडित सुरू राहिली. या निमित्ताने या शाळेने सोमवारी (दि. २७) रोजी शंभर दिवस शाळेचे हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. या निमित्ताने शाळा सुरू करण्याबाबतच्या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शाळेत नियमित येणारे विद्यार्थी व त्यांचे पालक आपले मनोगत व अनुभव कथन करणार आहेत.
............................
चोहोकडून विळखा तरी गाव सुरक्षित
हिवरेबाजारच्या शेजारी असणारे दैठणे गुंजाळ, जखणगाव, खातगाव टाकळी व इतर गावात कोरोनाचे रुग्ण सापडत असले, तरी हिवरेबाजार गाव सुरक्षित आहे. गावात नियमांच्या योग्य अंमलबजावणीमुळे गाव अजूनही सुरक्षित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळेच गावची शाळा सतत शंभर दिवसापासून सुरू आहे.