म्युकरमायकोसिसवर औषधे उपलब्ध करून द्यायला केंद्र सरकारने मदत केली पाहिजे. या आजारावर खर्च हा केंद्र आणि राज्य सरकारने केला पाहिजे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत शनिवारी (दि.२२) कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महसूलमंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यात गेल्या एक-दीड महिन्यापासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनदेखील करण्यात आला आहे. मात्र, तरीही अनेक जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. असा प्रश्न महसूलमंत्री थोरात यांना विचारला असता ते म्हणाले, लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत कडक निर्बंध पाळून कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा शून्यावर आणण्याशिवाय पर्याय नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. गावातील लोकांनी काळजी घेतली पाहिजे. घातलेले कडक निर्बंध हे जनतेच्या हिताकरिता आहेत. खरिपाचा हंगाम आला आहे. शेतीची कामे अपूर्ण असून, शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. पावसाळा बरा आहे अशी दिलासादायक बातमी आल्याने आणखीनच धावपळ होत आहे. याचासुद्धा परिणाम दिसत असून, गर्दी होते आहे. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली पाहिजे.