अहमदनगर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्वजीत माने यांच्याविरोधात ८ जुलै रोजी अविश्वास ठराव आणण्यात येणार आहे़ त्यासाठी विशेष सभा बोलवण्यात आली आहे़ मात्र, अध्यक्षा शालिनी विखे यांना विरोध म्हणून पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून माने यांच्याविरोधातील अविश्वास ठराव थांबविण्याच्या हालचाली सुरु आहेत़आॅगस्ट २०१७ मध्ये माने यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्विकारली़ तेव्हापासून माने व जिल्हा परिषद सदस्य यांचे सूत जुळले नाही़ सदस्यांच्या कोणत्याही सूचना माने ऐकत नाहीत, सदस्यांना माहिती दिली जात नाही, कामात पक्षपातीपणा केला जातो, कामांच्या फाईल्स अडवून ठेवल्या जातात, पदाधिकाऱ्यांनाही ते जुमानत नाहीत असे सदस्यांचे आरोप आहेत़ सर्वसाधारण सभांमध्येही यावरुन पदाधिकारी विरुद्ध अधिकारी असा सामना अनेकदा रंगला आहे़ माने यांच्याविरोधात फेब्रुवारीमध्येच अविश्वास ठराव आणावा, अशी मागणी सदस्यांनी अध्यक्षा विखे यांच्याकडे केली होती़ मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, या शक्यतेमुळे हा अविश्वास ठराव त्यावेळी बारगळला होता़ मात्र, आता दिव्यांग जवानाच्या पत्नीच्या बदलीवरुन आणि इतर बदल्यांवरुन सदस्यांसह अध्यक्षा विखे यांनी माने यांच्यावर थेट आरोप केले़ तसेच माने यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी विशेष सभाही बोलावली आहे़ सोमवारी (दि़८) ही सभा होत आहे़पालकमंत्री राम शिंदे यांनीच माने यांना नगरमध्ये आणले़ ते पालकमंत्र्यांचे विश्वासू अधिकारी आहेत, असेही बोलले जाते़ टँकर अनियमितता प्रकरणात पालकमंत्र्यांनी माने यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला होता़ या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर ठेकेदारांना सुमारे साडेदहा लाखांचा दंड केलेला आहे़ त्यावरुन टँकरमधील अनियमितता उघड झाली़पालकमंत्री राम शिंदे यांनी मध्यंतरी जिल्हा परिषदेत बैठक घेऊन कामे मार्गी लावली़ पण या बैठकीला अध्यक्षाच उपस्थित नव्हत्या़ पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच माने कामांमध्येही पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप सदस्यांमधून केला जात आहे़ स्मार्ट ग्राम योजनेतही पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघातील ८ गावांचा समावेश केला आहे़ त्यावरुनही सदस्यांमध्ये नाराजी आहे़ जिल्हा परिषदेतील अनेक योजनाही पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघात राबविल्या जात असल्याचा आरोपही सदस्य करीत आहेत़विखे विरुद्ध शिंदे संघर्ष पेटणार?राधाकृष्ण विखे काँगे्रस सोडून भाजपात गेले आहेत़ त्यांना भाजपने मंत्रीपदही दिले आहे़ पालकमंत्री आणि विखे हे एकाच पक्षात आहेत़ असे असतानाही पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माने अध्यक्षा विखे यांचेच आदेश पाळत नाहीत़ त्यामुळे माने यांच्यावरुन विखे व पालकमंत्र्यांमध्येच पुढील काळात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे़ त्याची सुरुवात माने यांच्यावरील अविश्वास ठरावापासून होऊ शकते़
पालकमंत्र्यांकडून सीईओंची पाठराखण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 4:50 PM