केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढू पाहत आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका
By शेखर पानसरे | Published: January 7, 2024 07:32 PM2024-01-07T19:32:51+5:302024-01-07T19:33:14+5:30
'भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे.'
संगमनेर: भारत अन्नधान्याच्या बाबत स्वयंपूर्ण आहे, तो फक्त काँग्रेसमुळेच. सहकार चळवळ ही ग्रामीण भागाला सशक्त बनवते. मात्र, केंद्र सरकार सहकारचळवळ मोडीत काढू पाहत आहे. राज्याचे सर्व अधिकार त्यांनी ताब्यात घेतले आहेत. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट पार्टी असून कर्नाटक मध्ये चाळीस टक्के कमिशन घेत होते. त्यामुळे जनतेने त्यांचा मोठा पराभव केला. राज्यात पाच कलमी विकास योजना निवडणुकीपूर्वी जाहीर करावी. संपूर्ण देशात काँग्रेसमय वातावरण असून भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी (दि.७) संगमनेरातील जाणता राजा मैदान येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार यांना, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने जैन इरिगेशन सिस्टिमला तर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्काराने आमदार पी. एन. पाटील यांना गौरविण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टिमचे संचालक अशोक जैन यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, माजीमंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते तथा माजीमंत्री भास्करराव जाधव, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, माजीमंत्री डॉ. विश्वजीत कदम , आमदार रवींद्र धंगेकर, आमदार झिशान सिद्दिकी, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार शिरीष चौधरी, आमदार राजेश राठोड, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार नामदेवराव पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार लहू कानडे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, बाजीराव खेमनर, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात यांसह राज्यभरातील आजी-माजी मंत्री काँग्रेसचे आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.