कर्जत : केंद्र सरकारने जुलैपासून सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांसाठी आणलेला नवीन कायदा क्लिष्ट आहे. हा नवीन कायदा तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील सराफ, सुवर्णकारांनी सोमवारी बाजारपेठ बंद ठेवून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळेे यांना देण्यात आले.
केंद्र सरकारने गेल्या दोन महिन्यांपासून सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांसाठी नवीन कायदा लागू केला आहे. तो खूप क्लिष्ट आहे. यामुळे व्यावसायिकांचे लिखाण काम वाढले आहे. दुकानातील मालाचे संरक्षण करायचे की लिखाण करायचे अशा द्विधा मनस्थितीत सराफ व सुवर्णकार सापडले आहेत. या कायद्याचा फेरविचार करावा यासाठी कर्जत तालुक्यातील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. हा कायदा मागे घेण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक शहाणे, सचिन कुलथे, शरद शेलार, अतुल कुलथे, अक्षय माळवे, किशोर कुलथे, जाहीद सय्यद, धनंजय महामुनी, संतोष कुलथे, अमोल टाक, अनिस सय्यद, वाजीद शेख आदींसह व्यापारी उपस्थित होते.
----
२३ कर्जत निवेदन
केंद्र सरकारने सराफ व सुवर्णकार यांच्यासाठी लागू केलेल्या नवीन कायद्याचा फेरविचार करावा या मागणीचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळेे यांना देताना संघटनेचे अध्यक्ष दीपक शहाणे व इतर.