पागोरी पिंपळगाव : सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांवर केंद्र सरकारकडून अन्याय होत आहे. सध्या देशात चालू असलेल्या कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांना शेतमाल कुठे विकायचा याची चिंता सतावत आहे. शेतमालाला बाजारपेठ नसताना शेती पिकवावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. केंद्र सरकारकडून रासायनिक खतांमध्ये ६०० ते ७०० रुपये दरवाढ करण्यात आली. केंद्र शासनाचा हा निर्णय अन्यायकारक आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे, अशी माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश सुपेकर यांनी दिली. अगोदरच संकटात असलेला शेतकरी खतांच्या दरवाढीच्या निर्णयामुळे अधिक संकटात येणार आहे. शेतकऱ्यांनी शेती सोडून हिमालयात जावे की काय? असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत. ज्या तुलनेत खतांचे दर वाढले त्या तुलनेत शेतकरी मालाचे दर अजिबात वाढलेले नाही. त्यामुळे शेती करणे जिकिरीचे बनले आहे, असे सुपेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने खत दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:22 AM