संगमनेर (जि. अहमदनगर) : कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. केंद्र सरकारची आयात-निर्यातीची धोरणं ही शेतकरीविरोधी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५४ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ गुरूवारी झाला. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे कर्नाटकातील नेते एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव, आमदार डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री मोकळ्या मनाचा माणूस
चव्हाण पुढे म्हणाले, मुख्यमंत्री मोकळ्या मनाचा माणूस आहे. त्यांनीच सांगितले मला सहकारातले काही कळत नाही. मग आम्ही त्यांना सांगितले, सहकारी साखर कारखान्यांना पैसे दिले नाहीत तर ते अडचणीत येतील. शेतातील उभ्या ऊसाला पैसे द्यावे लागतील. त्यानंतर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना कर्ज हमी देण्याचा निर्णय झाला. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे बॉयलर पेटत असताना दुसरीकडे केंद्रात वेगळाच बॉयलर पेटला आहे. शेतकरीविरोधी कायदे केले जात आहेत. अशी टीकाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी केली.