अहमदनगर: मुंबईत झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटरचे अंतर पाच तासांत पूर्ण करण्याची कामगिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केली आहे. प्रजासत्ताकदिनी पोलिस मुख्यालयात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते येरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे आदी उपस्थित होते. कर्तव्य बजावतानाच मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती गरजेची असते. यातून इतरांना प्रेरणा देण्याचे काम केल्याबद्दल पालकमंत्री विखे यांनी येरेकर यांचे विशेष कौतुक केले. येरेकर यांनी मुंबई मॅरेथॉनची तयारी एक वर्षापासून चालवली होती.
अहमदनगर रनर्स क्लबच्या माध्यमातून ते रोज धावण्याचा सराव करत होते. कॅन्टोन्मेंट, भुईकोट किल्ला परिसरात त्यांनी सराव केला. मुंबई मॅरेथॉनमध्ये जगभरातील ५९ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. नगरमधून १०० हून अधिक स्पर्धक गेले होते. अधिकारी म्हणून अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना ताणतणावांना सामोरे जावे लागते. अशा वेळी सकारात्मक राहून प्रश्नांची सोडवणूक करणे महत्त्वाचे असते. यासाठी नियमित व्यायाम असेल, तर शरीराची कार्यक्षमताही वाढते आणि मानसिक ऊर्जा मिळते, असाच संदेश ते सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना देऊन शारीरिक स्वास्थ्यासाठी प्रेरित करीत आहेत.