अहमदनगर: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून नगर शहरातील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात शहर व परिसरातील मराठा तरुण बांधव सहभागी झाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर एक डिसेंबरपासून राज्यभर साखळी उपोषण करण्याची हाक जरांगे पाटील यांनी दिली होती. त्यानुसारा अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या साखळी उपोषणात दररोज एका गावातील ग्रामस्थ उपोषण करणार आहेत. तसे नियोजन मराठा तरुणांकडून करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने नगर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले होते. यातील चार मराठा तरुणांनी अन्नत्याग केला होता. त्यामुळे त्यांची प्रकृति खालावली हाेती. आता दुसऱ्यांदा साखळी उपोषण करण्यात येत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील सूचना करतील, त्यानुसार हे आंदोलन सुरू पुढे नेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. साखळी उपोषणाला दररोज अनेकजण भेटी देत आहेत.