अहमदनगर : डॉ. सुजय विखे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असे साकडेच कर्जत-जामखेड परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना घातले. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तब्बल तासभर शिंदे यांच्याशी चर्चा केली. तर खासदार दिलीप गांधी हे दिल्लीत दाखल झाले असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि डॉ. सुजय विखे हे शनिवारी सायंकाळी एकाच हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले. या पार्श्वभूमीवर विखे यांचा भाजपाच प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चा आहेत. शनिवारी मंत्री महाजन यांनी घेतलेल्या बैठकीला पालकमंत्री राम शिंदे नव्हते. ते रविवारी दिवसभर त्यांच्या संपर्क कार्यालयात होते. यावेळी कर्जत-जामखेड येथील काही भाजपचे पदाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत विखे यांना उमेदवारी देऊ नये, असे साकडेच मंत्री शिंदे यांना घातले. कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशकडे कळविणार असल्याचे आश्वासन मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिले. शिंदे यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरडही या बैठकीला होते. विखे यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर खा. दिलीप गांधी शनिवारी रात्रीच दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होत असल्याने सोमवारी भाजपकडून पहिली यादी जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खा. गांधी यांनी दिल्लीत नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मोर्चेबांधणी केली आहे.
दरम्यान निवडणुकीसाठी पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत संघ कधीच हस्तक्षेप करीत नाही. राष्ट्रकार्य करणाºयांना मतदान करा, एवढाच संघाचा प्रचार असतो, असे संघाच्या नगर येथील स्वयंसेवकांनी सांगितले. विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत मात्र त्यांनी तो आमचा विषय नाही, असे स्पष्टपणे सांगितले. तर भाजपात तिकिट द्यावेत, असे कार्यकर्ते भरपूर आहेत. त्यांना सोडून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही, अशी भूमिकाच पक्षातील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.