अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेचे उमेदवार सचिन जाधव यांनी शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याची गुरुवारी शेवटची मुदत असली तरी स्थायी समितीमधील शिवसेनेची ताकद पाहता विरोधकांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता कमीच आहे. महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूकही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे मंगळवारपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. बुधवारी सकाळी दिलीप सातपुते यांनी सचिन तुकाराम जाधव यांच्यासाठी ३ अर्ज घेतले. ते तिन्ही अर्ज सचिन जाधव यांनी दाखल केले आहेत. तिन्ही अर्जावर स्थायी समितीच्या सदस्य सुनीता फुलसौंदर, दिलीप सातपुते, श्रीपाद छिंदम, उषा नलावडे, अनिल बोरुडे, छाया तिवारी यांच्या सूचक व अनुमोदक म्हणून सह्या आहेत. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उपनेते अनिल राठोड, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड आदी उपस्थित होते.शिवसेनेने भाजपच्या दोन्ही सदस्यांना सोबत घेवून सभापतीपदातील अडथळा आधीच दूर केला आहे. तसेच निवडणुकीमध्ये दगाफटका नको म्हणून सदस्यही सहलीवर पाठविले आहेत. विरोधकांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता कमीच आहे. तसे झाले तर निवडणूक बिनविरोध होईल. विरोधकांकडून अर्ज दाखल झाला तर स्थायी समितीमध्ये नियुक्त केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्यांना त्यांची अप्रत्यक्षपणे सहमती दिसून येईल. त्यामुळेच अर्ज दाखल होण्याची शक्यता नाही. गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.(प्रतिनिधी)
सभापती निवड बिनविरोधच्या मार्गावर
By admin | Published: August 04, 2016 12:22 AM