राहुरी शहरातील मार्केट यार्ड समोर नगर-मनमाड राज्य मार्गावर दुपारी १२ वाजता रास्ता रोको आंदोलन सर्वपक्षीय पुकारण्यात आले होते.
यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे संजय संसारे, संभाजी ब्रिगेडचे मच्छिंद्र गुंड, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, प्रकाश देठे, वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव, बाबूराव मकासरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे धीरज पानसंबळ, संतोष आघाव, शिवसेनेचे अविनाश पेरणे, संविधान बचाव संघर्ष समितीचे कांतीलाल जगधने, ज्ञानेश्वर जगधने यांची भाषणे झाली.
केंद्रातील भाजपा सरकारने जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले नवीन तीन काळे कायदे ताबडतोब रद्द करावेत. या मागणीसाठी गेल्या ७० दिवसांपासून संपूर्ण देशातील शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर लोकशाही मार्गाने व शांततेने आंदोलन करीत आहेत. परंतु केंद्रातील भाजपा सरकारवर अद्याप काहीही परिणाम झाला नाही. उलट सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सत्तेचा व बळाचा गैरवापर करून शेतकऱ्यांवर दडपशाही व अत्याचार करीत आहे. या जुलमी व बेबंदशाही भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी व संयुक्त किसान एकता मोर्चाने पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, श्रमिक शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, समता परिषद, अखिल भारतीय छावा व विविध पुरोगामी संघटना आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
सरकारने सदर आंदोलनाची व शेतकऱ्यांच्या भावनांची वेळीच दखल घेऊन, शेतकरी विरोधी काळे कायदे ताबडतोब रद्द करावेत. अन्यथा संपूर्ण देशात अधिक व्यापक, उग्र व तीव्र आंदोलन केले जाईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार राहील, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. आंदोलकांनी राहुरी तहसीलदार एफ.आर.शेख यांना यांचे निवेदन दिले.