शरद शिंदेआढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव, तांदळी दुमाला, घुगलवडगाव, देऊळगाव, घोडेगाव आणि परिसरातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्राला कुकडीचे पाणी देणारी चारी क्रमांक १२ ची दुरवस्था झाल्यामुळे हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. चारीच्या दुरवस्थेमुळे पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यास अडथळा येत आहे. दीड वर्षांपूर्वी चारी दुरुस्ती केल्याचा फक्त देखावा केला आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी झालेला खर्च वाया गेला आहे.
परिसराला वरदान ठरलेले कुकडीचे पाटपाणी सहजासहजी मिळणे दुरापास्त झाले असून त्याची कारणे अनेक आहेत. परंतु, मुख्य कालव्यापासून पूर्ण क्षमतेने शेतकऱ्याच्या जमिनीपर्यंत पाणी देण्यासाठी आवश्यक असलेल्या चा-यांची दुरवस्था हे सुद्धा एक महत्वाचे कारण आहे. सुमारे सोळा किलोमीटर लांबी असलेली चारी क्रमांक १२ ही दगडी बांधकाम असलेली तालुक्यातील एकमेव चारी आहे. बांधकाम करतेवेळी योग्य पध्दतीने केले नाही. त्यामुळे चारीची रुंदी कमी झाली. सध्या ठिकठिकाणी चारीचे बांधकाम कोसळले असून चारीची रुंदी आणखी कमी झाली आहे. त्यामुळे पूर्ण दाबाने पाणी सोडले तरी पाणी मिळत नाही. आवर्तनाचा ‘हेड टू टेल’ असा नियम असूनही या चारीवर मुख्य कालव्यापासून सात किलोमीटरच्या पुढे पाणी जातच नाही. त्यामुळे शेवटच्या शेतकºयांपर्यंत पाणी मिळत नाही. या चारीच्या दुरुस्तीसाठी दीड वर्षापूर्वी निधी आला. काही ठिकाणी केलेल्या डागडुजीच्या कामाचा दर्जा पहिल्याच आवर्तनात उघड झाला. नव्याने केलेल्या या काँक्रिटीकरणाला अनेक ठिकाणी तडे गेले असून काँक्रिटीकरणाच्या मजबुतीसाठी मातीचा भराव टाकण्याचा विसर काम करताना पडला असल्याचे दिसत आहे. पाण्याचा दाब वाढल्यास चारी फुटून शेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतक-यांनी चारी दुरुस्तीची मागणी केली आहे.दुरुस्ती आवश्यकदीड वषार्पूर्वी खर्च झालेल्या निधीबद्दल माहिती नसून माझ्या कार्यकाळात निधी आला नाही. परंतु, चारीचे मजबुतीकरण आणि रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे शाखा अभियंता रमेश इथापे यांनी सांगितले.