लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये २३ फेब्रुवारीपासून पुढील ७२ तासांच्या कालावधीत वादळी वा-यासह गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या संदर्भात दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले आहे.नागरिकांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल तर या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. विजेपासून व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मोकळे मैदान, झाडांखाली विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या विद्युत तारा, विद्युत खांबापासून दूर रहावे. जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावी. अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज आणि गारपिटीपासून गुरा-ढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा, तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी (०२४१-२३२३८४४) वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- कांदा, गहू, फळबागांना धोका
- सध्या अनेक ठिकाणी कांदा, गहू, ज्वारी आदी पिके काढणीच्या उंबरठ्यावर आहेत. बागायत भागात मोठ्या प्रमाणात डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू आदी फळबागा असून, त्यांना फळे लगडली आहेत. मागील पंधरवड्यात गारपिटीचा फटका विदर्भासह मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात बसला. अनेक फळबागांचे मोठे नुकसान झाले. नगर जिल्ह्यात अशा मोठ्या वादळाची व गारपिटीची शक्यता कमी असली तरी खबरदारी म्हणून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे