राहुरी : अनुदानातून वगळण्यात आलेल्या चंदन शेती करणा-या शेतक-यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आता सातबारा उताºयावर चंदनाची नोंद केली जाणार आहे. याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी सचिवांना आदेश दिला आहे. दोन वर्षापूर्वी युती सरकारच्या काळात चंदनाचा समावेश अनुदानात करण्यात आला होता. मात्र औषधी वनस्पतीमध्ये चंदनाचा समावेश नव्हता. त्यामुळे चंदन उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित होते. कृषी विभागाने दोन वर्षापासून अनुदान रोखले होते. यासंदर्भात चंदन उत्पादक शेतकरी राजेंद्र गाडेकर मुंबईत यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन लक्ष वेधले. त्यानंतर सचिव एकनाथ डवले यांना कृषिमंत्र्यांनी चंदन शेतीला अनुदान देण्याचे आदेश दिले. आमदार निलेश लंके व राजेंद्र गाडेकर यांनी चर्चा केली. इतिवृत्तात राहिलेला चंदन शब्द समावेश केल्याने शेतक-यांना हेक्टर ५८ हजार रूपये अनुदान मिळणार आहे. सातबारा उता-यावरही आता चंदनाचे पीक आले आहे. पूर्वी तलाठी कार्यालयात चंदनाची सातबारा उता-यावर नोंद घेत नव्हते. त्यामुळे शेतकरी चंदन शेती करण्यास उत्सुक नव्हते़ शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे आता चंदन सातबारा उता-यावर आले आहे. बांधावर उगवणारे व चोरांचे तावडीत सापडणारे चंदन पीक आता शेतात डोलू लागले आहे. महाराष्ट्रात गेल्या चार वर्षापासून शेतामध्ये चंदन लावणा-या शेतक-यांची संख्या वाढत आहे. अनुदान मिळणार असल्याने भविष्यकाळात नगर जिल्ह्यासह राज्यात डाळिंबाप्रमाणे चंदनाच्या बागा दिसू लागतील.
सातबा-यावर होणार चंदनाची नोंद-दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 6:39 PM