अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून अहोरात्र झटून भारतीय शास्त्रज्ञांनी ‘चांद्रयान-२’ या यानाला घेऊन काल प्रक्षेपक पृथ्वीच्या कक्षेकडे झेपावले. जगाचे लक्ष लागून राहिलेली भारताची महत्वाकांक्षी योजना यशस्वी झाली. या इस्त्रोच्या मोहिमेमध्ये एका नगरकराचा मोलाचा वाटा राहिला. अहमदनगर येथील भिंगारमधील प्रदीप देवकुळे यांनी ‘चांद्रयान-२’ मध्ये महत्वाची संदेशवहन करणा-या यंत्रणेची जबाबदारी सांभाळली.
प्रदीप देवकुळे मुळचे अहमदनगर शहराजवळील भिंगार येथील. वडील रत्नाकर देवकुळे महाराष्ट्र पोलिस खात्यात असिस्टंट सब इन्पेक्टर होते. प्रदीप यांचे दहावीपर्यतचे शिक्षण भिंगार हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर अहमदनगर महाविद्यालयात बारावीपर्यतचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबाद येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर ३ वर्षे नोकरी केली. २००८ साळी इस्त्रोमध्ये त्यांना संधी मिळाली. २००८ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) येथील उपग्रह केंद्रात ते कम्युनिकेशन गृप येथे वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. मंगळयान मोहिमेतही त्यांच्याकडे कम्युनिकेशन डिपार्टमध्ये महत्वाची जबाबदारी होती.
‘चांद्रयान २’ चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर गोळा केलेली माहिती विक्रम लँडरकडे पाठवणार आहे. विक्रम लँडर ती माहिती आॅर्बिटरकडे पाठवणार आहे. हीच माहिती आॅर्बिटर बंगळूर येथील केंद्रावर पाठविणार आहे. या प्रक्रियेमध्ये पाठविण्यात येणारे संदेश पोहोचण्यासाठी लागणारे अँटेना, रीसिव्हर, ट्रान्समीटर तयार करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी प्रदीप देवकुळे यांच्याकडे होती. कम्युनिकेशन हार्डवेअरचे महत्वपूर्ण काम देवकुळे यांनी सांभाळले.
कंम्प्युटरवर केलेले डिझाईन आणि थेरॉटिकल डिझाईन तपासणे आणि जुळविण्याचे अवघड काम देवकुळे यांनी केले. अँटेना, रीसिव्हर, ट्रान्समीटरचे प्रोटाटाईप त्यांनी बनविले. चांद्रयान-२ यशस्वी झाल्यामुळे देवकुळे यांच्या कामगिरीचा नगरकरांना अभिमान वाटत असून त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या या प्रवासात पत्नी नंदिनी आणि मुलगी आरोही यांचीही त्यांना मोलाची साथ मिळत आहे.
इस्त्रोचे चेअरमन के. सिवम यांच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा जगाला भारतीय लोकांची नवनवी उंची गाठण्याची क्षमता दाखवून दिली आहे. मी या अभियानाचा एक भाग बनल्याचा अभिमान वाटत असल्याचे देवकुळे यांनी सांगितले.