अहमदनगर : शेतकऱ्यांना शेतमाल आणण्यासाठी अडचण होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथील भाजीपाला विक्रीच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी आडतदारांकडून करण्यात आली. त्यावर समितीकडून तातडीने दखल घेत, भाजीपाला विक्रीच्या वेळेत बदल केला. ही वेळ उद्या (शनिवार)पासून दुपारी तीन ऐवजी साडे चार करण्यात आली आहे, अशी माहिती उपसभापती संतोष म्हस्के यांनी दिली. नेप्ती उपबाजार येथे भाजीपाला आडतदारांची दुपारी तीन वाजता बाजार समितीच्या उपकार्यालयात आयोजित बैठक पार पडली. यावेळी नीलेश सुंबे, लंकेश काटकर, सचिन सप्रे, रोहित कोतकर, अंकुश काळे, अशोक तांबे, राजेंद्र सातपुते, महेश गुंजाळ, शंतनू म्हस्के, प्रशांत गुंड, सुधीर कार्ले, विशाल निमसे, आतिष व्यवहारे, अरविंद रासकर आदी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून शेतमालाची बाजारात वेळेवर आवक होत नाही.तसेच पुणे, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना आड ना नीड वेळेमुळे भाजीपाला मिळत नसल्याची ओरड होती. या सर्व बाबींचा विचार करून बाजार समितीने वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे आडतदारांच्या शिष्टमंडळाने सांगितले. |
नगर बाजार समितीतील नेप्ती उपबाजारमधील भाजीपाला विक्रीच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:17 AM