लोणी : पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हा विश्वास होता. फडणवीस यांच्या पुन्हा येण्याने राज्याला अस्थिरतेकडे घेऊन जाणारांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.राज्यात शनिवारी सकाळी मोठा राजकीय भूकंप बसला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस सोडून भाजपवासीय झालेले माजीमंत्री राधाकृष्ण विखे सध्या कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनाला पडला होता. मुंबईत राजकीय घडामोडी वेगाने सुरू असताना विखे हे शनिवारी सकाळी आपल्या शिर्डी मतदारसंघातच होते. सकाळी ९.३० वाजता प्रवरानगर (ता.राहाता) येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बाँयलर अग्निप्रदीपन व ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या ठिकाणी विखे उपस्थित झाले होते. यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांना गराडा घातला. राज्यातील जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला मतदान केलेले आहे. राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांना संधी दिली होती. भाजपच सरकार स्थापन करेल हा आम्हाला विश्वास होता, अशी प्रतिक्रिया विखे यांनी दिली. कार्यक्रमानंतर दुपारी दोन वाजता शिर्डी येथून विखे हे विमानाने मुंबईकडे रवाना झाले.
महाराष्ट्राला अस्थिरतेकडे घेऊन जाणारांना चांगलीच चपराक-राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 2:18 PM