पाथर्डी : निवडणूक आली की नाटक करायचे. त्यानंतर कोण कोणत्या जातीचा हे पाहून कामे करायची आणि जातीयवाद पोसायचा. पुन्हा आमच्या कुटुंबावर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप करायचा ही त्यांची जुनीच सवय असल्याची टीका जिल्हा परिषद सदस्या प्रभावती प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर केली.पाथर्डी तालुक्यातील मोहटे, पिंपळगाव टप्पा, चिंचपूर पांगुळ, वडगाव, ढाकणवाडी, जोगेवाडी, भिलवडे, करोडी आदी गावातील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला शिरसाट, माजी पंचायत समिती सदस्या सुमन खेडकर, माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले, आरती नि-हाळी, डॉ. राजेंद्र खेडकर आदी उपस्थित होते.ढाकणे म्हणाल्या, माझे पती प्रतापराव यांनी संघर्षाचा वारसा जनहितासाठी जोपासला आहे. गेल्या २७ वर्षापासून ते जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. ही निवडणूक ख-या विरुद्ध खोट्याची आहे. या भागातील जनतेने ढाकणे साहेबांना घडविले. त्यांच्यावर अमाप प्रेम केले. ढाकणे कुटुंबीयांनी जनतेची नाळ तुटू दिली नाही. ढाकणे साहेबांच्या काळात अनेक पाझर तलाव झाले. विरोधकांकडे आता काही उरले नसल्याने भावनिकतेचा मुद्दा पुढे करत आहेत. परंतु, जनता आता सुज्ञ झाली आहे. त्यांच्या बेगडी प्रेमाला जनता फसणार नाही, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
जातीपातीचा आरोप ही त्यांची जुनीच सवय-प्रभावती ढाकणे; मोहटे, चिंचपूरला प्रचारसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 5:13 PM