शिर्डी : साईबाबांच्या समकालीन भक्तांचे आम्ही खरे वारसदार असून पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे कुठलीही शहानिशा न करता आम्हाला शिस्तभंगाच्या नोटीसा बजावणा-या अधिका-यांच्या विरोधात न्यायालयात कायदेशीर दाद मागणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गोंदकर म्हणाले, साईबाबांचे समकालीन भक्त म्हणून गोंदकर, कोते, संकलेचा, गायके व इतर काही असल्याच्या नोंदी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने प्रकाशित केलेल्या ‘श्री साई सच्चरित्रात’ आहेत. सदर समकालीन भक्तांचे वारसदार नियमितपणे पालखी सोहळ्यात सहभागी होतात. त्या अनुषंगाने २२ नोव्हेंबर रोजी निघालेल्या साई पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे संस्थान प्रशासनाने दिलेल्या पत्रान्वये मंदिराचे सुरक्षा अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी शिर्डीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना लेखी पत्राद्वारे संबंधितांवर शिस्तभंगाची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास कळविले. त्यावरून माने यांनी माझ्यासह शिर्डीचे माजी नगरसेवक राजेंद्र गोंदकर, कोपरगावचे माजी नगरसेवक कृष्णा आढाव, भाजपा कार्यकर्ते दिलीप संकलेचा, शिवसैनिक अमोल गायके, व्यावसायिक कैलास जाधव व सदाशिव गोंदकर आदींना भारतीय दंडविधान १४९ नुसार शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये म्हणून नोटीसा बजावल्या. वास्तवत: आम्ही पालखी निघण्याच्या पध्दतीत कुठेही अडथळा आणलेला नाही. असे असताना संस्थान व पोलिसांनी कशाच्या आधारे आम्हाला दोषी ठरविले? पालखी सोहळ्यात आमच्यासह सहभागी इतर लोकांना काय निकष लावले? इतरही साईभक्त असताना आम्हालाच दोषी का धरले? असे सवाल उपस्थित करून नोटीसा बजावण्यापुर्वी सीसीटीव्ही फुटेज तपासले नसल्याने संबंधित अधिकाºयांविरूध्द कायदेशीर मार्गाने न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोंदकर यांनी स्पष्ट केले.
नोटीसा बजावणा-यांविरूध्द न्यायालयात दाद मागणार : शिवाजी गोंदकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 5:27 PM