अहमदनगर : अंधश्रद्धा व स्वार्थी हेतूने मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी जिल्हा न्यायालयात नुकतेच प्रथम सहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सोलापूरचा पंडित प्रदीप मार्तंडराव जाधव, देवस्थान ट्रस्टचा तत्कालीन विश्वस्त संदीप रावसाहेब पालवे, रवींद्र बाजीराव शिंदे, पुरुषोत्तम शशिकांत रोडी, विक्रम रभाजी दहिफळे व श्रीधर लक्ष्मण गिरी यांच्याविरोधात तपासात समोर आलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या उर्वरित आरोपींचा तपास सुरू असून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे त्यांच्या विरोधात पुरवणी दोषारोपत्र दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींपैकी प्रदीप जाधव व संदीप पालवे यांना पोलिसांनी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
गुन्ह्यात नाव असलेले तत्कालीन अध्यक्ष न्यायाधीश नागेश नाव्हकर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर १३ मे रोजी सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण
मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना सुमारे दोन किलो सोन्याची सुवर्ण यंत्रे बनवून ती मूर्तीखाली पुरण्यात आली होती. त्यावरील पूजाअर्चेसाठी २५ लाख रुपये पंडिताला देण्यात आले होते. ‘लोकमत’ने यासंदर्भात २०१७ साली ‘मोहट्याची माया’ ही वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निमूर्लन समितीने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. तसेच देवस्थानचे माजी विश्वस्त नामदेव गरड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने या प्रकाराची गंभीर दखल घेत दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन अध्यक्षांसह विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी २४ जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात ५ फेब्रुवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे हे करत आहेत.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाचेही जबाब
मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी नगर येथील धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाकडे २०११ साली तक्रार झाली होती. त्याची या कार्यालयाने चौकशीही केली. मात्र, चौकशीनंतर आजतागायत या कार्यालयाने काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे या कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही पोलीस जबाब घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या तोंडी आदेशावरून मोहटादेवी देवस्थानची चौकशी स्थगित केल्याचा प्रकार घडला आहे. त्यासंदर्भात सहधर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशीही सुरू आहे. मात्र, तो अहवाल अद्याप समोर आलेला नाही.