श्रीरामपूर येथील एमआयडीसी परिसरामध्ये ७ मार्च रोजी व्यापारी हिरण यांचा मृतदेह सापडला होता. तत्पूर्वी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. मात्र हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरण पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले होते. प्रारंभी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करत गृह विभागावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी श्रीरामपुरात ठाण मांडून तपासाची चक्रे फिरविली होती. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनीही बेलापूर येथे हिरण यांच्या अपहरणाच्या ठिकाणाची पाहणी केली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर गुन्ह्यातील पाच मुख्य आरोपींना सिन्नर (जि.नाशिक) येथून ताब्यात घेण्यात आले होते. आरोपींनी व्यापारी हिरण यांच्या अपहरणासाठी वापरलेली कार, मोटारसायकल तसेच हत्यारे जप्त करण्यात आले. बेलापूर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. तपासादरम्यान २५ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्या आधारे ५०५ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आरोपींमध्ये अजय राजू चव्हाण (वय २६), नवनाथ धोंडू निकम (वय २३), आकाश प्रकाश खाडे (वय २२), संदीप मुरलीधर हांडे (वय २६) व जुनेद बाबू शेख (वय २५) यांचा समावेश आहे.
--------
असा रचला कट
सर्व आरोपी हे २७ फेब्रुवारी रोजी सिन्नर जवळील ढग्याचा डोंगर येथे एकत्र आले. तेथे त्यांनी गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण करून त्यांना जीवे ठार मारून त्यांचे जवळील रोख रक्कम जबरीने चोरून घेण्याचा तसेच प्रेताची विल्हेवाट लावण्याचा कट रचला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.